राजगड ते तोरणा

आदल्या दिवशी आलेल्या बिबट्याच्या राजगडजवळ वावराच्या बातम्या, रात्री जेमतेम चार तास झालेली झोप, निघायला नेहेमींच्याच कारणांनी झालेला थोडासा उशीर, नंतरचा आधी महामार्ग, राज्य महामार्ग आणि नंतर गावातील अतंर्गत हेमामालिनीचा गालांप्रमाणे गुळगुळीत (?!!) रस्त्यांवरचा फारच मौज आणणारा असा एकंदरीत दीड दोन तासांचा प्रवास, पायथ्याशी गारेगार थंडीत गरमागरम पोहे खायची आलेली उबळ व तिची पूर्तता. त्यामुळे तुडुंब भरलेले पोट आणि तिथेच एक ताणून द्यावी अशी झालेली इच्छा. ही पार्श्वभूमी.

२० डिसेंबर २०२५ रोजी फटफटायला लागले आणि बरोब्बर ६:३० वाजता पाली गावाहून राजगडाकडे जाणाऱ्या वाटेवर पाहिले पाऊल. पाली दरवाज्यापर्यंत पोहोचताना वाटेवर तोरण्याचे पाठीमागे असणे, राजगडाच्या मागे सूर्योदय आणि त्यामुळे राजगडाची सावली तोरण्यावर पडलेली असं विहंगम दृश्य.

साधारण तासाभरात राजगडावर पाऊल. मग जरा फोटोग्राफी

आणि तडक पद्मावती माचीला बगल देऊन, बालेकिल्ल्याच्या पाठीमागून संजीवनी माचीच्या दिशेने वाटचाल. संजीवनी माची समोर दिसत असतानाच डावीकडे आळू दरवाज्यातून शिताफीने बाहेर पडून थोडे खाली उतरून U turn मारून संजीवनी माचीच्याच खालून उतरायला सुरवात. तो पर्यंत ८:३० झालेले. घसरडी उतरण, त्यामुळे मंदावलेला वेग, नंतर लागलेले घनदाट रान अशी तास साधारण पाऊण एक तास पायपीट आणि लागलेली खरीव खिंडीचा वेल्हे आणि भोर तालुक्यांना जोडणारा आडवा डांबरी रस्ता. तेथे येईपर्यंत पायात येऊ लागलेले गोळे. त्यामुळे बरोबर आणलेल्या मिनरल्स , विटामिन्स आणि मिठाच्या सरबताचे प्राशन. तेथे रस्त्यावरच एका आजी आजोबांकडून विकत घेऊन निवांत ताक बीक पीत असताना अचानक झालेली सोसायटी मधील एका निष्णात ट्रेकरची भेट. त्याच्या बरोबर फोटो, मग आम्हाला मागे सोडून त्याच्या ग्रुपची वेगाने पुढे वाटचाल. त्याचा समोरच्या टेकडीवर चढतानाचा वेग पाहून आम्हाला भरलेली धडकी.

पुढे आमची त्याच दिशेने आगेकूच. भरभर पाय उचलत एक दोन टेकड्या पार करत कचरे मामांच्या घराजवळ त्यांना गाठणं. मग परत त्यांनी केलेला पेरू संत्र्याचा आग्रह. त्यातलं थोडं खाऊन लगोलग पुढे वाटचाल आणि परत एक दोन टेकड्या पार. मधल्या टप्प्यात परत काही छोट्या टेकड्या चढ उतार. त्यात एका उंच डोंगराच्या धारेवरून चालत असताना खाली दरीत काटकोनात असलेल्या आणखी एका डोंगराच्या धारेवरून चालत असलेल्या काही मानवाकृतींनी आमच्या दिशेने मोठ मोठे हाकारे पुकारे करत लक्ष वेढलेलं.  मग दोन पावलं मावतील एवढ्याच मोठ्या पाऊलवाटेवर जेमतेम डोकं झाकलं जाईल एवढ्या कारवीच्या सावलीत फतकल मारून केलेला बरोबर आणलेल्या पराठे चटणी आणि खजुराच्या लाडवांचा नाष्टा. तो पावेतोवर १०:३० वाजलेले.

पुढें बुधला माचीच्या पायथ्यापर्यंत दीड तासांची वाटचाल. मधूनच ऐकू येणारे मघाचे ते हाकारे पुकारे. बरीच पायपीट केल्यावर मध्ये पुन्हा एकदा विश्रांतीसाठी उभ्या उभ्याच थांबलेलो असताना त्या पुकाऱ्यांच्या आवाजांच्या मालकांनी – म्हणजे १० -१२ वर्षाच्या दोन मुलांनी – आम्हाला गाठलेलं. त्यांची ताक विकत घेण्याचा विनंतीवजा आग्रह. मग तक बाटलीत भरून घेता घेता त्यांची कहाणी. ७वी आणि ६वी मध्ये असलेल्या त्या दोन भावांनी पाठीवरच्या पिशवीत ताकाच्या ८ – १० बाटल्या लादून त्यांनी आम्हाला दरीमधून धावत येऊन गाठलेलं. एक वाटेतच थांबणार होता तर दुसरा गडावर वडिलांकडे निघाला होता. त्यांचे कष्ट पाहून खूप वाईट आणि अपराधीही वाटलं.

त्यातील एकाला बरोबर घेऊन बरोबर 12 वाजता बुधला माची चढायला सुरुवात. तो झरझर पुढे गेला. ती खडी चढाई मजल दरमजल करीत चढून बुधला माचीवर १२:३० वाजता आमचे आगमन. मग परत एकदा पाणी, सरबताचा कार्यक्रम. आणि मग मात्र धडकी भरविणारा कातळ चढताना उडालेली घाबरगुंडी. कसे बसे शिडीपर्यंत पोचून शिडीवरून चढून जाऊन शेवटचा टप्पा पार करताना काढलेले विजयी वीरांचे व्हिडिओ. अजून पुढची वाटचाल माहीत नसल्याने अज्ञानात सुख म्हणतात तसे चेहेऱ्यावर आलेले हसू. 

मग परत एकदा तास भराची खडी चढाई. त्यात दोन ठिकाणी कशाला आलोय आपण इथे? का करतोय हे सर्व? असे प्रश्न पडावेत असे दोन कातळावरचे अवघड टप्पे.

त्यात एका टप्प्यावर तर कसलाही आधार नसता दोन फूट रुंद आणि साधारण आठ एक फूट उंचश्या एका अत्यंत सपाट आणि सरळसोट कड्याला चिकटलेल्या भिंतीवरून पलीकडे उतरणे आणि लगेच लावलेल्या रेलिंगला दरीच्या बाजूने चिकटून जाऊन वर शंभर एक फूट चढून जाणे. ब्रह्मांड आठवणे म्हणजे काय याचा प्रत्यय.

शेवटी एकदा २ च्या सुमारास कधीतरी सर्वात उंच असलेल्या मुख्य दरवाज्यापाशी. तिथून जेमतेम वीसेक मिनिटांची विश्रांती घेऊन लगेच गड उतरायला सुरुवात. आमच्यापैकी काहीजण भरभर पुढे. मी मात्र उजवा गुडघा त्रास देऊ लागल्याने अत्यंत हळू हळू चालत त्यांच्या बराच मागे. प्रत्येक पावलाला होणाऱ्या वेदना, त्यामुळे आणखी मंदावणारा वेग आणि खूपच मागे पडल्याची भावना त्यामुळे त्वेष, ह्याच्या मिश्रणातून सतत चालत नेटाने पुढे केलेली वाटचाल. शेवटी ४:१०च्या सुमारास खाली पार्किंग मध्ये आधी पोहोचलेल्यांबरोबर भेट. मग लक्ष पूर्तीच्या आनंदात विसरले गेले केलेले कष्ट आणि प्रचंड दुखणाऱ्या पायांची वेदना. शेवटी समाधानाने आणि अभिमानाने घराकडे परतीचा प्रवास.

राजगड पाली बाजूने चढून, संजीवनी माचीच्या बाजूने आळू दरवाज्यातून थोडे खाली उतरून मग डोंगरधारेवरून छोट्या मोठ्या ६ / ७ टेकड्या ओलांडून तोरण्याच्या बुधला माची पर्यंत पोहोचून तेथून गड चढून दुसर्या बाजूने वेल्ह्यात उतरणे असा (आमच्यासारख्या कुडमुड्या ट्रेकर्सच्या मानाने) जंगी कार्यक्रम एका दिवसात पूर्ण!!

गेल्या वर्षी कात्रज ते सिंहगड ह्या एका दिवसात कसाबसा पूर्ण केलेल्या ट्रेकमुळे असलेली भीती आणि शक्यतो हा राजगड सिंहगड ट्रेकही कोणी एका दिवसात करत नाही असे नकारात्मक मुद्दे. तर कात्रज सिंहगड सारखा ट्रेक सुद्धा आपण – कसा का होईना – शेवटी पूर्ण केला आणि दिवसाच्या उन्हात पूर्ण केला हा आत्मविश्वास वाढविणारा अभिमान, त्यानंतर गेल्या दीडदोन वर्षांत ह्याच सर्व मित्रामंडळीसोबत वर्षात केलेले अनेक छोटेमोठे ट्रेक आणि त्यातील भन्नाट थरार आणि मजा ह्यामुळे वाढलेला आत्मविश्वास, उत्साह. आणि मुख्य म्हणजे अनेक वर्षांची हा पूर्वी एकदा अपूर्ण राहिलेला ट्रेक पूर्ण करण्याची ठाम इच्छा ह्या सर्वांनी त्यावर मात केली आणि एका दिवसात पूर्ण केलेला राजगड ते तोरणा हा ट्रेकही यादीत समाविष्ट झाला. आता पुढच्या ट्रकची तयारी!!

Leave a comment