
पूर्वजांचे मूळ स्थान असलेल्या कोकणाशी जोडली असलेली एक अदृश्य नाळ आणि त्यामुळे असलेली आंतरिक ओढ दरवर्षी आम्हाला कोकणात घेऊन जाते! कोकणातला निसर्ग, समुद्रकिनारे, तिथली माणसं आणि त्यांची आपुलकी, भाषेचा खास कोकणी हेल आणि संवादाला समृद्ध शब्दसंपदा, खास ठेवणीतील कोंकणी ‘विशेषणे’ आणि म्हणी यांची सहजच मिळणारी जोड , भाषेतकीच जिभेचे कोड पुरवणारी संपन्न खाद्यसंस्कृती, भक्कम जांभ्याच्या चिरांनी बांधलेली कौलारू घरं, घरामधील साधेपणा, टापटीप हे सर्व मनाला इतकं भावतं अन आपलंसं , हवहवसं वाटतं की तिथे एकदा गेलं की पाय सहजी निघत नाही!
रत्नागिरी राजापूर रस्त्याने (किनाऱ्याजवळून जाणाऱ्या रस्त्याने, गोवा महामार्गाने नव्हे) पावस मागे टाकून राजापूर कडे जाताना सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आडीवरे गाव लागते. रत्नागिरीहून इथे पोहोचायला सुमारे एक तास लागतो. ‘एक तास!!?’ म्हणून भुवई उंचवू नका. रस्ता कोकणातला आहे. अगदी पूलंनी म्हैस कथेत वर्णन केलंय तसा! फक्त आता लाल मातीची जागा डांबराने आणि खडीने घेतली आहे आणि नशीब चांगलं असेल तर रस्त्यावर डांबर दिसतंही! असो!!
गावातील महाकाली देवस्थान प्रसिद्ध असून अडीवऱ्यासह पंचक्रोशीतील छोट्या वाड्या-वस्त्यांचे ग्रामदैवत आहे. इथुनच आणखी पुढे मिनिटभरात छोटीशीच पण कठीण वळणावळणाची उभी चढण चढून सड्यावर आल्यावर लगेचच उजवीकडे एक लहानसा रस्ता फुटतो. हा रस्ता धरून सड्यावरुन खाली पायथ्याशी वसलेल्या आणि जवळपास चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या पंचवीस एक उंबऱ्याच्या राजवाडी गावाकडे आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा चालू होतो. ह्या बहुतांश डांबरी, पण अतिशय अरुंद आणि तीव्र उताराच्या रस्त्यावरून घसरगुंडी प्रमाणे गाडी खाली घसरल्याचा भास होऊन क्षणभर हृदयाचा ठोका चुकतो आणि ज्याचे दर्शन घ्यायला चाललो आहोत त्याचा धावा आपण आपसूकच करू लागतो!!

परंतु क्षणभरातच सड्यावरून दूरवर दिसणारे डोंगर आणि खोल दरी डाव्या बाजूच्या माडा-पोफळीच्या, आंबा-काजूच्या गर्द झाडामागे लुप्त होतात आणि आपल्या मनातील भीती कुठच्या कुठे पळून जाते. त्या वाड्यामध्ये राबणारे कष्टकरी आणि त्यांनी डोंगर उतारावर व्यवस्थितपणे राखलेल्या ह्या वाड्या पाहून त्यांच्याविषयी कौतुक मनात दाटून येते. जादू झाल्याप्रमाणे हवेत गारवही वाढतो. प्रवासाने मनाला आणि शरीराला आलेला थकवा, मरगळ कुठच्या कुठे पळून जाते. ‘इथे आपलं घर हवं होतं, मग मी यांव केलं असतं अन त्यांव केल असतं’ अश्या बाता चालू असतानाच रस्त्याचा उतार संपतो आणि अचानक एक पर्ह्या (ओढा किंवा लहानशी नदी) अन त्यावरील काठ नसलेला छोटा पूल दृष्टिक्षेपास पडतो. सर्वजण समोरील दृश्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहतात. पर्ह्याचे निवळशंख पाणी, परिसरातील नीरव शांतता, फक्त पाण्याचा मंजुळ खळखळाट, त्यात मधूनच मिसळून जाणारी एखाद्या रानपाखरची लकेर, पाण्यात पडलेलं संभोवतींच्या झाडांचं आणि एखादाच चुकार ढग असलेल्या निळ्याभोर अभाळचं प्रतिबिंब, हे सर्व एखाद्या सुंदर चित्राप्रमाणे भासतं. हे दृश्य क्षणभर थांबून कॅमेरात आणि मनात साठवून घेऊन ह्या पर्ह्याला डावीकडे सोबत ठेऊन आपण पुढे निघतो.
मिनीटभरातच राजवाडी गाव लागते. गावात दिसतात ती काही मुलं आणि म्हातारी माणसं. कर्ती मंडळी कुठेतरी बागांमध्ये काम करण्यास गेली असावीत. गाव तसं छोटच, एक दोन वळणं घेताच संपतं! लगेच डाव्या बाजूला एक आणखी अरुंद असा रस्ता लागतो. तो जातो भराडेवाडी कडे. आता मात्र रस्त्यावरील डांबर नावालाच उरलेलं असतं. पुन्हा एकदा पर्ह्यावरील एक अरुंद पूल ओलांडून आपण एक छोटीशी चढण चढतो आणि पर्ह्याला उजव्या बाजूस टाकतो. लगेचच डाव्या बाजूला ग्रामपंचायतीची एक सुंदर स्वच्छ शाळा लागते. शाळेसमोर सुंदर पटांगण आहे. आवारात मोठी मोठी झाडं आहेत. शाळेच्या दोन तीन छोट्या बैठ्या इमारती नुकत्याच रंगवलेल्या दिसतात. करोना टाळेबंदीमुळे शाळा सध्या बंद असल्याने ओकीबोकी वाटते. अश्या शाळेत जाणारी मुलं खरंच भाग्यवान! ह्या विचारात असतानाच अचानक उजव्या बाजूला रस्त्यापासून थोडसं खालच्या बाजूला एक देऊळ दिसतं. हे आहे वाडा मोगरे, भराडे वाडी येथील लक्ष्मीनारायणचे देऊळ.
हे माझ एक अत्यंत आवडतं ठिकाण आहे. नक्की काय ते सांगता येणार नाही, पण इथे खरोखरीच देवाचं अस्तित्व असल्याचं जाणवतं! इथे असलेली शांतता, निर्मळ परिसर, आजूबाजूची वनराई, रानफुले आणि रानमेवा, त्यांचा गंध वाहून आणणारा मंद वारा, गर्द झाडांमधून किलबिलणारे परंतु क्वचितच नजरेस पडणारे पक्षी, डोंगर उतारांवर निर्धोकपणे चरणाऱ्या गायींच्या गळ्यातील किणकिणणाऱ्या घंटा, डोंगरांच्या कुशीत वसलेली आणि झाडांमधून हळूच डोकावणारी घरं, त्यांना जोडणाऱ्या वाटा, त्यांवरून क्वचितच दिसणारी साधी सरळ कष्टाळू तरीही हसतमुख समाधानी माणसं,स्वच्छंदपणे खेळांमध्ये रममाण झालेली मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरील निर्व्याज हसू ह्या सर्वांमधून आपल्याला वारंवार त्याच्या अस्तित्वांच्या खुणाच दिसत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष देवळापर्यंत पोहोचण्याआधीच आपलं मन निर्मळ होवून मंगल पवित्र भावाने भरून जातं!
प्रथम दर्शनीच प्रेमात पडावं असा परिसर आहे हा! गडीतून उतरल्या उतरल्या नजरेत भरते ती कोकणचे वैशिष्ट असलेल्या जांभा दगडाच्या चिऱ्यांनी बांधलेली देऊळवाड्याची भक्कम कुंपणाची भिंत, मुख्य देवळाची इमारत आणि त्यावरील उंच कळस, देवळाचे प्रवेशद्वार असलेली देवडी आणि त्यासमोरील भलामोठा आम्रवृक्ष! आंब्याच्या दंत पर्णसंभरातून वाट काढत जमिनीवर उतरणाऱ्या उन्हाची खालच्या भगव्या मातीवरची रांगोळी आपलं स्वागत करते. दुरून ऐकू येणाऱ्या धनेशाच्या हाळीने आपण आल्याची वर्दी दिली जाते. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच एक छोटीशी दीपमाळ आपलं स्वागत करते. पूर्वी इथे दोन उंच पण जीर्ण झालेल्या दीपमाळा होत्या. एक दिवाळीला त्यावरती चढून सर्व दिवे लावून आम्ही दिवाळी साजरी केली होती. आता देवळाच्या जिर्णोद्धारानंतर एक छोटी दीपमाळ नव्याने बांधली आहे. संपूर्ण देवळाचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वीच झाला. त्या आधी इथे थोडेसे लहान पण दगडी पायथ्यावर (ओटा) पूर्ण लाकडी मंडप असलेले कौलांनी शाकारलेले देऊळ होते. आता जिर्णोद्धारानंतर मूळ गाभ्यास फारसा धक्का न लावता पक्के पण तितकेच नेटके दुमजली बांधकाम केले आहे.
हे देवस्थान शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात असावे (स्थापना शके १५३३ म्हणजेच इ. स. १६११) . पुढे वेळोवेळी ह्याचा जीर्णोद्धार कधी ग्रामस्थांकरवी तर कधी तत्कालीन छत्रपती वा पेशवे यांच्याकडून झाला असे उल्लेख सापडतात. (संदर्भ : ‘देव दर्शन जिल्हा रत्नागिरी , लेखक: मोरेश्वर के. कुंटे व सौ. विजया कुंटे). चार पायऱ्या चढून आपण देवळाच्या मुख्य मंडपात येतो. इथूनही आपल्याला गाभाऱ्यातील लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीचे दर्शन होतं. मंडप ओलांडून आणखी आत गेलं की मुख्य मंदिरात आपल्याला गाभारा दिसतो. गाभाऱ्यासमोर जमिनीवर एक दगडी कासव आहे.गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस सुंदर दगडी गणपती आणि उजव्या बाजूस दत्तात्रेयाची मूर्ती आहे. पैकी गणपती मूळ आहे तर दत्तात्रेयाची स्थापना जिर्णोद्धाराच्या वेळी झाली असावी. दोन्ही मूर्तीना सुंदर फुले आणि हार घातलेले आहेत.
गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणाची शाळीग्रामात घडवलेली सुमारे दोन फूट उंच सुंदर पुरातन मूर्ती आहे. आपल्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असलेले नारायण आपले वाहन असलेल्या गरुडावर डावी मांडी मोडून बसलेले आहेत आणि त्यावर आपली उजवी मांडी मोडून लक्ष्मी बसलेली आहे. खालच्या बाजूस दोन द्वारपाल आहेत. मूर्तीच्या मागे सुंदर प्रभावळ आणि वरती नाग आहे. मूर्तीला सुंदर ताज्या फुलांनी सजवलेले आहे. एक मोठा ताजा तुलसीहार घातलेला आहे. मूर्तीकडे पाहून अत्यंत प्रसन्न वाटतं. मुख्य गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालताना आपल्या भिंतींवर तीन बाजूस कोरीव लाकडी कोनाड्यात बसवलेल्या विष्णु दशावताराच्या अतिशय सुंदर पाषाणातील मूर्ती दिसतात. मूळ देवळात ह्या नव्हत्या. जिर्णोद्धाराच्या वेळी नव्याने बसवलेल्या आहेत पण मूळ देवळास साजेश्या आशा आहेत. प्रदक्षिणा घालून आपण पुनः एकदा मूर्तीसमोर येतो आणि हात जोडून मंडपात बसतो तेव्हा तिथून जावेसेच वाटत नाही!!















